निबंध स्पर्धा

कॉसमॉस फाउंडेशन व कौशलम् न्यास आयोजित निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल व बक्षीस वितरण समारंभ
कॉसमॉस फाउंडेशन पुणे व कौशलम् न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातून घेण्यात आलेल्या ‘आदर्श व समर्थ भारताचे निकष काय असावेत?’ या निबंध स्पर्धेचा अंतिम निकाल व बक्षीस वितरण समारंभ शनिवार दि. २९.११.२०२५ रोजी टिळक रोडवरील नीतू मांडके हाऊस येथील संचेती सभागृहात सर्व स्पर्धक, सहभागी शाळांचे शिक्षक, मुख्याध्यापक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.


सदर स्पर्धेत एकूण ८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे परीक्षक म्हणून वरिष्ठ शिक्षणतज्ञ व कॉर्पोरेट प्रशिक्षक डॉ. शरद जोशी आणि जेष्ठ अर्थतज्ञ व व्यवसाय नियोजक डॉ. अनिल धनेश्वर यांनी काम पाहिले.

स्पर्धेत प्रथम क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग या शाळेतील कु. समर्थ चौधरी याने तसेच द्वितीय क्रमांक परांजपे विद्यामंदिर शाळेतील कु. शाल्वि कुलकर्णी हिने तर तृतीय क्रमांक स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालयातील कु. सायली मंचाळ हिने पटकावला. कॉसमॉस फाउंडेशन कडून प्रथम विजेत्यास रु. १५०००/- द्वितीय विजेत्यास रु. १००००/- व तृतीय विजेत्यास रु. ५०००/- त्याचबरोबर उत्तेजनार्थ म्हणून १० स्पर्धकांना प्रत्येकी रु. १०००/- अशी भरघोस बक्षीसे उपस्थित परीक्षक व श्रीमती लीना मेहेंदळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या शाळेतील जास्तीत जास्त स्पर्धक भाग घेऊन उत्तम उत्तम निबंध लिहीतील अशा शाळेस कॉसमॉस फाउंडेशन च्या वतीने ‘कॉसमॉस करंडक’ या नावाने खास बक्षीस ठेवण्यात आले होते. अशा पहिल्या बक्षिसाचे मानकरी होण्याचा मान कात्रज, पुणे येथील स्व. रामभाऊ म्हाळगी माध्यमिक विद्यालय या शाळेला मिळाला. या शाळेतून एकूण ३२ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता.