१०वी व १२वी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
दि.२२.०८.२०२६ रोजी कॉसमॉस फाउंडेशनने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील १०वी व १२वीच्या परीक्षेत भरघोस यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ श्री गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक टिळक रोड येथे आयोजित केला होता. सदर कार्यक्रमास कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मा. श्री. सचिन आपटे तसेच बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ.श्री. रामचंद्र साठ्ये यांनी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाची शोभा वाढवली.पाहुण्यांचा परिचय संस्थेच्या सचिव ऍड.सौ.अनुराधा अंतापुरकर- भारती यांनी करून दिला.
संस्थेचे अध्यक्ष ऍड. श्रीपाद पंचपोर यांनी पाहुण्यांचे आणि विद्यार्थ्यांसह उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती बाबत माहिती दिली आणि गुणवंत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. आपटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वत:च्या आवडीचे करिअर निवडण्यासाठी पाठपुरावा करावा, आपल्या विचारांमध्ये स्पष्टता असावी व आपल्या धेयावर सदैव लक्ष केंद्रित असावे याविषयी विद्यार्थांना मार्गदर्शन केले. तसेच स्वतःस ‘WHY’ विचारून उत्तर शोधावे म्हणजे ‘HOW’मिळवणे किंवा साध्य करणे सोपे जाते असे सांगितले.
तर डॉ. श्री. साठ्ये यांनी अभ्यासाबरोबरच मशागत केलेले संस्कारी मन ध्येयपूर्ती करण्यासाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत रामदास स्वामींच्या जीवनावरील घटना सांगून विद्यार्थ्यांना पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांना कर्तव्याची व जबाबदारीची जाणीव करून देऊन समर्थांच्या विचारानुसार व आचरणानुसार प्रत्येक विद्यार्थ्याने आदर्श व्यक्तिमत्व तयार करावे. आपले कुटुंब आणि गुरुजन तसेच ज्येष्ठांचा मानसन्मान व आदर्श ठेवून देशाभिमान वाढवावा. कोणत्याही नोकरीच्या मागे न धावता संस्कारीत व गुणवान विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिमतीवर, जिद्दीवर आणि हुशारीवर स्वतःचे स्टार्टअप व्यवसाय चालू करून स्वतःबरोबर अनेकांनाही रोजगार उत्पन्न करावा आणि भारत वर्षाला विश्वगुरू या पदी नेऊन पोहोचवावे असे विचार मांडले. आपले संस्कारित विद्वत्तेमधून आणि श्री समर्थ रामदास स्वामी यांचे चरित्रावर अथ् पासून इति पर्यंत, केलेल्या आगाध अभ्यासातून सलग ६० मिनिटांहून अधिक काळ अस्खलितपणे समर्थांच्या जन्मापासून ते त्यांच्या विद्वत्तेपर्यंत आणि कर्तुत्वापर्यंत विद्यार्थ्यांना उत्तम असे मार्गदर्शन केले.
कु. अनन्या आठल्ये आणि कु. तनिष्का पाटील या सत्कारार्थी विद्यार्थीनींनी आपले मनोगत व्यक्त करून फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमातून पुढील वाटचालीसाठी प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.