समर्थ रामदास स्वामी यांच्या श्र्लोकांची आंतरशालेय वक्तृत्व व पाठांतर स्पर्धा

कॉसमॉस फाउंडेशन, पुणे या न्यासातर्फे पुणे शहराचे पश्चिम भागातील माध्यमिक शाळातील ५ वी ते ७ वी आणि ८ वी ते १०वी या दोन गटातील विद्यार्थ्यांमध्ये अनुक्रमे पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये पहिल्या फेरीसाठी ९ माध्यमिक शाळातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व या स्पर्धांमधून प्रत्येक शाळेने पहिले तीन विद्यार्थी निवडून ९ शाळांपैकी ४० विद्यार्थी अंतिम फेरीसाठी निवडले.

 या अंतिम निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये दि.८ ऑगस्ट २०२६ रोजी सौ. विमलाबाई गरवारे प्रशाला, डेक्कन जिमखाना या शाळेत कॉसमॉस फाउंडेशन तर्फे सदर स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी समर्थ रामदास स्वामींच्या संदर्भात सखोल अभ्यास केलेल्या श्रीमती सीमा लोमटे आणि डॉ. विद्या गोखले यांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इ. ५ वी ते ७वीच्या गटात झालेल्या पाठांतर स्पर्धेत अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स या शाळेतील इ. ५ वीतील विद्यार्थिनी राज्ञी भागवत हिने प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच अभिनव विद्यालय (मराठी विभाग) या शाळेतील ७ वी तील तन्वी शंभाळे हिने द्वितीय क्रमांक तर न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या शाळेतील इ. ५ वी तील ओजस कनोजे याने तृतीय क्रमांक पटकावला. त्याचप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेमध्ये माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयातील ९ वी मधील चित्कला क्षीरसागर तसेच इ. ८ वी मधील रिद्धी केदारी व राधेय कापरे या तिघांनी अनुक्रमे पहिला दुसरा व तिसरा असे क्रमांक पटकावले. मात्र यामधील द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी तितकेच तुल्यबळ स्पर्धा करून न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड मधील इ. ८ वी तील विद्यार्थी सिद्धार्थ शिंदे व इ. ९ वी तील विद्यार्थिनी आद्या सातारकर या दोघांनीही त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांबरोबर समप्रमाणात गुण मिळवून द्वितीय व तृतीय नंबरसाठी १/२ प्रमाणात स्वतःचा हक्क प्राप्त केला व त्यानुसार परीक्षकांनीही द्वितीय क्रमांकाचे २०००/-रुपयांचे बक्षीस रिद्धी केदारी व सिद्धार्थ शिंदे या दोघांना समप्रमाणात विभागून देण्याचा निर्णय घेतला व त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचे १०००/- रुपयांचे बक्षीस ८वीतील राधेय कापरे व इ. ९ वीतील आद्या सातारकर यांना विभागून देण्यात आले. सदर स्पर्धेसाठी समर्थ रामदास स्वामींचे नावाची ट्रॉफी प्रत्येक विजेत्यास देण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांनाच कॉसमॉस फाउंडेशनच्या वतीने प्रशस्तीपत्रक देण्यात येऊन सर्व विजयी विद्यार्थ्यांचा सत्कार कॉसमॉस फाउंडेशनचे अध्यक्ष ऍड. श्री. श्रीपाद पंचपोर यांनी केला. सौ विमलाबाई गरवारे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रोहिदास भारमल यांचे हस्ते विजयी विद्यार्थ्यांना बक्षिसे अदा करून कॉसमॉस फाउंडेशनच्या वतीने सचिव ऍड. सौ. अनुराधा भारती (अंतापूरकर) यांनी प्रशस्तीपत्रके दिली. तसेच फाउंडेशनच्या विश्वस्त ऍड. सौ. राधिका उर्सेकर (पंचपोर) यांनी उपस्थितांचा परिचय करुन दिला.

सदर कार्यक्रमात स्पर्धक विद्यार्थ्यांनी समर्थ रामदासांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी आपल्या श्र्लोकांमध्ये जे सांगितले त्या शिकवणीची सद्यस्थितीत प्रत्येक व्यक्तीस, विशेषतः मुलांना किती गरज आहे हे निरनिराळ्या उदाहरणांसह उत्तमरीत्या
विश्लेषण करून सांगितले. त्याचप्रमाणे श्रीमती सीमा लोमटे यांनी आपले समर्थांवरील आणि त्यांचे जीवनातील अनेक गोष्टींवर अभ्यासपूर्वक विचार सादर करून समर्थांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि विशेषत्वाने उत्तम समाज घडवण्यासाठी व उत्तम प्रशासक घडवण्यासाठी जे अनमोल प्रयत्न केले तेही आपल्या विचारातून प्रगट केले.
समर्थ रामदास स्वामींचे विचार व आचरण हे सद्यस्थितीत प्रत्येक मनुष्याने कसे आचरणात आणणे आवश्यक आहे आणि ते व्यवहारिक दृष्ट्या सुद्धा प्रत्येकास किती गरजेचे आहे असे विचार डॉ. विद्या गोखले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते समय प्रगट केले. अॅड. सौ राधिका उर्सेकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.